Saturday 3 December 2011

25, 50, 75

होशियार, कोहिनूरचे मालक, लोकसभेचे माजी स्पीकर, महाराष्ट्राचे पहिले ब्राह्मण मुख्यमंत्री, बाळासाहेब ठाकरे यांच्या शब्दांच्या धाकात वावरून वावरून कणा मऊ झालेले श्रीमान रा. रा. मनोहर जोशी सर यांनी आता लेखनकामाठी सुरू केली आहे. त्यामुळे अनेक मराठी लेखकांचं दुकान बंद होण्याच्या मार्गावर आहे हो? तेव्हा होशियार..
 
सरांनी राजकारणात उमेदवारी केली (तिथं त्यांची किती डाळ शिजली हा भाग वेगळा!), ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले (काय केलं ते विचारू नका!), क्लासेस चालवले (त्यातली किती मुलं पास झाली हेही कृपा करून विचारू नये! ), इमारतीही बांधल्या (शू, त्याविषयी अजिबात बोलायचं नाही!) आणि आता सगळं करून झाल्यावर लेखनकामाठी सुरू केली आहे! परवाच गुरुजींच्या, त्रिकालाबाधित आणि भविष्यात अनंत वर्षे बाजारात राहण्याची शक्यता असलेल्या चार बहुमोल आणि आखुडशिंगी, बहुदुधी पुस्तकांचं मंबापुरीत प्रकाशन झालं.
 एकाच वेळी एका लेखकाची अनंत पुस्तकं प्रकाशित होण्याची ही काही पहिली वेळ नाही असं काही लोक कुत्सितपणे म्हणतील. मरोत ते!
सर लोकसभेचे स्पीकर होते, त्या काळात त्यांना सारखा मुंबई-दिल्ली प्रवास करावा लागत असे. विमानातल्या वेळात त्यांनी डायरी लिहिली. तिचं बी-वननावानं पुस्तक प्रकाशित केलं. ते मुंबईतल्या एका प्रकाशकानं प्रकाशित केलं होतं. पण त्यानंही ते न वाचताच छापलं असावं. त्यामुळे वाचकांनीही ते वाचलंच नाही असं म्हणतात! तसंही लोकसभेत स्पीकरला फार बोलण्याचं काम नसतं. बोलतात ते खासदार-मंत्री. स्पीकरला त्यांना आवरण्याचं काम करावं लागतं. म्हणून सरांनी डायरी लिहून आपली बोलण्याची हौस भागवली खरी, पण ते लोकसभेतल्या स्पीकरच्या खुर्चीत शातंपणे बसून असायचे तसेच राहिले असते तरी बरं झालं असतं, अशी नंतर बरेच दिवस चर्चा सुरू होती म्हणतात!
 
पण उडाले ते कावळे अणि राहिले ते मावळेअसा शिवसैनिकांचा बाणा असतो. सरांनी तर थेट शिवसेनेवर पीएच.डी.च केली आहे. केवढी ही मेहनत आणि केवढा हा अभ्यास? शिवाय तेवढंच करून ते थांबले नाहीत तर त्यांनी आपलं बहुमोल संशोधन पुस्तकरूपानेही उपलब्ध करून दिलं. त्यांचं ऋण महाराष्ट्रानं कसं फेडावं बरं? (की तसंच राहू द्यावं?) त्यांची ही तळमळ आणि अभ्यास पाहून आम्हाला कधी कधी भरून येतं! आता हेच पहा ना परवा त्यांनी एक-दोन नव्हे तर थेट चार पुस्तकं प्रकाशित केली आहेत. एक पुस्तक मुलाखतींचं आहे. पण ते सरांच्या नव्हे तर सरांनी घेतलेल्या इतरांच्या मुलाखतींचं. ज्यांचा व्यवसाय 100 कोटींचा आहे, त्यांच्या त्यात सरांनी मुलाखती घेतल्या आहेत म्हणे! दुसरं पुस्तक आहे सरांच्या राज्यसभेतील भाषणांचं. तिसरा त्यांचा एक थिसिस आहे.
 
..आणि चौथं सरांचं आत्मचरित्र आहे. त्याचं नाव आहे, 25, 50, 75. हे काय नाव आहे असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर त्याचा खुलासा असा आहे की, सरांनी या पुस्तकामध्ये जगण्याचा मूलमंत्र ठरावा असा सिद्धांत मांडला आहे. विशेष म्हणजे तो स्वत:च्या आयुष्यातल्या अनुभवांवरून मांडला असल्याने तो नाकारण्याचा सवाल येत नाही. उलट त्याबद्दल महाराष्ट्रानं त्यांचे आभारच मानले पाहिजेत. तो सिद्धांत असा आहे की, वयाच्या पंचवीसाव्या वर्षापर्यंत शिक्षण घ्यावं, पन्नासाव्या वर्षापर्यंत पैसे कमवावेत आणि पंचाहत्तराव्या वर्षापर्यंत मौजमजा करावी. सर स्वत: असंच आयुष्य जगले. आपल्या आयुष्याचं इतकं काटेकोर नियोजन करणा-या सरांनी आत्मचरित्रातही कुठेही अघळपघळपणा केला नाही. त्याचं लेखन आणि मांडणी त्यांनी अगदी काटेकोर केली आहे. पंचविसाव्या वर्षापर्यंतच्या कालखंडाला त्यांनी फक्त पंचवीस पानंच दिली आहेत. शिवाय प्रत्येक पानावर एक फोटो आहे. पन्नासाव्या वर्षापर्यंतच्या भागासाठी  पन्नास पानं दिली आहेत. याभागातही प्रत्येक पानावर एक फोटो आहेच. शेवटच्या म्हणजे पंचाहत्तराव्या वर्षापर्यंतच्या कालखंडासाठी ७५ पानं आहेत. प्रत्येक पानावर एक फोटो आहेच. सरांचं स्वत:वर किती निर्व्याज आणि निस्वार्थी प्रेम आहे, त्याचा हा पुरावाच!
 म्हणजे गुरुजींनी शिक्षणासाठी 25 वर्ष खर्च केली, गडगंज संपत्ती कमावण्यासाठी 25 वर्ष खर्च केली आणि मौजमजा करण्यासाठीही पंचवीस वर्षे खर्च केली. 2 डिसेंबरला ते पंचाहत्तर वर्षाचे झाले. त्यामुळे आता गुरुजी काय करणार असा प्रश्न आम्हाला पडला आहे. शिकून झालं, पैसे कमावूनही झाले आणि मौजमजा करूनही झाली. आता ते संन्यास घेण्यासाठी हिमालयात जातात की, आजवर घेतलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करायला इगतपुरीच्या विपश्यना केंद्रात जातात, ते पाहायचं. आम्ही तर ज्याम एक्साइट झालोय बुवा त्यांचा भावी संकल्प ऐकण्यासाठी.

No comments:

Post a Comment