Saturday 22 October 2011

टाकसाळे तुम्हीसुद्धा?

गोष्ट फेसबुकवरची आहे. या फेसबुकवर - मराठी भाषेत म्हणायचे तर चावडीवर - एकंदर ज्या पद्धतीच्या आणि ज्या वकुबाच्या कमेंट पास केल्या जातात, त्या वाचून सोडून द्याव्या अशा नाहीच तर वाचायच्याही लायकीच्या नसतात. तरीसुद्धा बरेचसे लोक आपण सॉक्रेटिस, आइनस्टाइन, कार्ल मार्क्‍स,   डॉ. आंबेडकर, नरहर कुरुंदकर यांच्यापेक्षाही बुद्धिमान आहोत अशा थाटात कमेंटाकमेंटी करत असतात. मूळ विषय काय, हे न पाहता आपली अक्कल पाजळत असतात. त्यातून त्यांना आनंद वगैरे मिळत असावा. नेटरवरच्या अशा ब-याच साइटसना ‘सोशल नेटवर्किंग साइटस’ असे उच्चभ्रू नाव काही रिकामटेकडय़ा मंडळींनी ठेवले आहेच, त्यामुळे अशा कमेंटाकमेंटीतून या लोकांचे सोशल नेटवर्क वाढत असावे. पृथ्वीचा आकार जसा ज्याच्या त्याच्या डोक्याएवढाच असतो, तसेच कुणाला काय वाटावे (किंवा त्याने वाटून घ्यावे) हा प्रश्नही ज्याच्या त्याच्या वकुबाचा असतो.
 
स्वभावाने, प्रकृतीने आणि लेखनधर्मानेही मूलत: गंभीर असणा-या मुकुंद टाकसाळे यांचे फेसबुकवर आगमन झाल्याला बरेच दिवस झाले. मध्यंतरी त्यांनी फेसबुकवर खूप वेळ वाया जातो, म्हणून तिथून एग्झिटही घेतली होती. पण त्यांना काय वाटले कुणास दखल, त्यांनी पुन्हा एंट्री मारली. सगळ्या गोष्टींकडे गंभीरपणे पाहणारी टाकसाळे यांच्यासारखी पाच-दहा लोकं फेसबुकवर सापडतात, तेव्हा बरेच वाटते. बुडत्याला काडीचा आधार असतो, तसा मराठी लोकांच्या फेसबुकवरच्या उठवळ भाऊगर्दीत टाकसाळे यांच्यासारखे काही लोक आधार असतात, असे आम्ही आपले सुरुवातीपासून मानत आलो. पण ‘मी कुठलीही गोष्ट गृहीत धरत नाही आणि इतरांनाही धरू देत नाही’ हे वाक्य कुठेतरी टाकसाळे यांच्या वाचनात आले असावे. ते त्यांनी लगेच अमलात आणायचे ठरवले. मात्र, त्यासाठी निवड केली ती फेसबुकची. त्यामुळे त्याचा बभ्रा व्हायचा तो झालाच.
 
तर गोष्ट अशी की, दिवाळी अगदी तोंडावर आल्यामुळे अनेक विक्रेत्यांनी सालाबादाप्रमाणे आपल्या दिवाळी अंकांच्या सवलत योजना जाहीर केल्या. त्यानुसार मॅजेस्टिकनेही आपला सवलत संच जाहीर केला. त्या संचात नेहमीप्रमाणे ‘मौज’, ‘दीपावली’, ‘अक्षर’, ‘कालनिर्णय सांस्कृतिक’, ‘महाराष्ट्र टाइम्स’ आणि ‘अनुभव’ या सहा दिवाळी अंकांचा संच आहे. संचाची 25 ऑक्टोबपर्यंत आगावू नोंदणी करणा-यांना तो सवलतीत दिला जाणार असून त्यासोबत ‘पोटच्या पोरी नाहीशा होत आहेत’ (गीता अरवामुदन), ‘राधेने ओढला पाय..’(मुकुंद टाकसाळे), ‘पुढल्या हाका..’ (सुबोध जावडेकर) आणि ‘आरोग्यसंपन्न आधुनिक जीवनाकरिता आयुर्वेद’ (शुभदा पटवर्धन) या चार पुस्तकांपैकी कुठलेही एक पुस्तक भेट मिळणार आहे.
 
..तर या संचाची जाहिरात मॅजेस्टिकने फेसबुकवर केली. त्यावर टाकसाळे यांनी 5 ऑक्टोबरला कमेंट केली की, ‘‘हा संच खरंच विकत घेण्याजोगा आहे. एक तर सारे अंक दर्जेदार आहेत. आणि त्याबरोबर दिली जाणारी पुस्तकंही दर्जेदार आहेत (इथे त्यांनी स्माइली टाकले आहे.) मी माझे पैसे पाठवले. तुम्ही???’’ त्यावर एक-दोन फेसबुकभाऊंनी लगेच, ‘आय अ‍ॅम नेक्स्ट’, ‘आय अ‍ॅम डुइंग सो’ अशी कमेंटाकमेंटी केली. प्रत्यक्षात संच बुक केला की नाही माहीत नाही. तर ते असो. पण अजून काही भाऊंनी आपल्या कोकरउडय़ा मारायच्या आधीच औरंगाबादच्या ‘जनशक्ती वाचक चळवळ’ या प्रकाशन-विक्री संस्थेच्या श्रीकांत उमरीकरांनी टाकसाळे यांच्यावर मोठा बॉम्ब टाकला. त्यांनी कमेंट केली, ‘‘मोठं आश्चर्य आहे! टाकसाळे यांचं स्व:चं पुस्तक या योजनेत आहे. ते मॅजेस्टिकचे लेखक आहेत. ललितमध्येही त्यांचं लेखन नियमित असते आणि तेच याची जाहिरात करत आहेत. आपले पुस्तक आपणच खरेदी करून त्याची जाहिरात लेखकाला करावी वाटत असेल तर याला काय म्हणावे? टाकसाळेंसारख्या वाङ्मयीन संस्कृतीची गंभीर जाण असणा-यांकडून तरी असले उठवळ चाळे अपेक्षित नाहीत.’’
 
उमरीकरांनी मुंबई-पुण्याबाहेरच्या प्रकाशकांना येणारे अनुभव, ग्रंथांच्या प्रसाराबाबतीतील अडचणी अशा ब-याच गोष्टींचा पाढा त्यानिमित्ताने वाचला. त्यावर परत काही फेसबुकभाऊंनी कोकरउडय़ा मारल्या-‘बरोबर आहे, बरोबर आहे’, ‘बरोबर नाही’.
 
आता फेसबुकवर आपल्या नावाने काय लाह्या फुटताहेत हे टाकसाळे यांच्या, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, उशिरा लक्षात आले. मग त्यांनी खुलासा केला, ‘‘श्रीकांत.. दिवाळी अंकांचा संच त्यांनी चांगला दिलेला आहे, हे खरंच आहे. त्यात माझं पुस्तक आहे, हा योगायोगाचा भाग. तो नसता तरी मी हेच लिहिलं असतं.. अनेकदा आपल्याला हवे ते अंक नेमके एकत्र नसतात. मग नाइलाज म्हणून कुठला तरी एखादा नको असलेला अंक गळ्यात मारून घ्यावा लागतो. तसं इथं होणार नाही. दर्जेदार दिवाळी अंक घेणा-यांना जे अंक नेमके हवे असतात, ते इथं आहेत, एवढंच मला म्हणायचं आहे..’’
 
टाकसाळे यांचा हा खुलासा वाचून ‘ज्युलिअस सीझर’ या शेक्सपिअरच्या नाटकातील सीझरचे ते प्रसिद्ध वाक्य - ‘ब्रूटस यू टू?’ - आठवले. टाकसाळे यांच्या गुणात्मक आणि दर्जेदार लेखनाबद्दल काहीच वाद नाही. म्हणूनच उमरीकरांनी त्यांच्याकडून सार्वजनिक विधानं करताना तारतम्याची अपेक्षा केली, ती वाजवीच म्हटली पाहिजे. पण टाकसाळे यांनी जो खुलासा केला तो, ब्रुटस यू टु? याचीच पुन्हा आठवण करून देणारा ठरला. कारण जे अंक अजून म्हणजे 5 ऑक्टोबरपर्यंत बाजारात आलेलेच नसणार, त्यांना न पाहताच, न वाचताच टाकसाळे यांनी केवळ पूर्वेतिहासावरून यंदाही ‘दर्जेदार’ ठरवून टाकले. दुसरी गोष्ट मॅजेस्टिकच्या संचात हे अंक निदान अलीकडच्या काही वर्षात तरी असतातच असतात, ते याच वर्षी आहेत, असे अजिबात नाही. म्हणजे गेल्यावर्षीपर्यंत हा संच दर्जेदार नसायचा की काय? शिवाय ‘मौज’चा अंक आहे म्हणून तो दर्जेदारच आहे किंवा ‘अक्षर’ आहे म्हणून तो दर्जेदारच आहे, असा दावा करणं (प्रकाशनाआधीच तरी) वस्तुस्थितीला धरून नाही. आता ज्या अंकांत एखाद-दुसरा चांगला लेख (किंवा कथा) तो अंक दर्जेदार अशी तर टाकसाळे यांची दर्जाची व्याख्या नाही ना? पण अंक प्रसिद्ध व्हायच्या आधीच त्यांना सर्टीफिकेट देणे हा त्यांच्या पूर्वपुण्याईचा भाग की दबदब्याचा? आणि त्याला टाकसाळे यांनी भुलावे?
टाकसाळे यू टू?
हेच या संचासोबत भेट मिळणा-या पुस्तकांबाबतही आहे. प्रत्येक संचासोबत चारपैकी आपल्या आवडीचे कोणतेही एकच पुस्तक भेट मिळणार आहे. पण टाकसाळे यांनी सा-याच पुस्तकांना मिष्किलपणे का होईना पण दर्जेदार ठरवून टाकल्याने पंचाईत झाली आहे. कारण संचासोबत चारही पुस्तकं भेट मिळणार नाहीत. थोडा निर्लज्जपणा करून मागितली तरी मॅजेस्टिकवाले म्हणणार, ‘साहेब, संच घ्यायचा तर घ्या, नाहीतर फुटा.’ म्हणजे उरलेली तीन पुस्तकं विकत घ्यावी लागणार!
 
त्यात टाकसाळे आयुर्वेदावरच्या पुस्तकालाही दर्जेदार ठरवून मोकळे झाले आहेत. त्यात खरेही आहे म्हणा. कारण संच विकत घेणारे बहुतांश लोक उपयुक्तता मूल्य पाहून भेट पुस्तक म्हणून याच पुस्तकाची निवड करणार. त्यामुळे उरलेल्या तिन्ही पुस्तकांना टाकसाळे यांनी दर्जेदार ठरवूनही त्याचा फारसा फायदा होणार नाही.
 अहो, टाकसाळे आपले शब्द किमान वाया जाणार नाहीत, याची तरी काळजी घ्या. बाकी चूकभूल द्यावी घ्यावी लागतेच हो!

2 comments:

  1. सुंदर... अतिसुंदर. अशी फोडणी हवीच आहे. नाही तर नुसतीच बुळबुळीत भेंडीची भाजी खावून कंटाळा आला आहे.

    ReplyDelete