Saturday 22 October 2011

टाकसाळे तुम्हीसुद्धा?

गोष्ट फेसबुकवरची आहे. या फेसबुकवर - मराठी भाषेत म्हणायचे तर चावडीवर - एकंदर ज्या पद्धतीच्या आणि ज्या वकुबाच्या कमेंट पास केल्या जातात, त्या वाचून सोडून द्याव्या अशा नाहीच तर वाचायच्याही लायकीच्या नसतात. तरीसुद्धा बरेचसे लोक आपण सॉक्रेटिस, आइनस्टाइन, कार्ल मार्क्‍स,   डॉ. आंबेडकर, नरहर कुरुंदकर यांच्यापेक्षाही बुद्धिमान आहोत अशा थाटात कमेंटाकमेंटी करत असतात. मूळ विषय काय, हे न पाहता आपली अक्कल पाजळत असतात. त्यातून त्यांना आनंद वगैरे मिळत असावा. नेटरवरच्या अशा ब-याच साइटसना ‘सोशल नेटवर्किंग साइटस’ असे उच्चभ्रू नाव काही रिकामटेकडय़ा मंडळींनी ठेवले आहेच, त्यामुळे अशा कमेंटाकमेंटीतून या लोकांचे सोशल नेटवर्क वाढत असावे. पृथ्वीचा आकार जसा ज्याच्या त्याच्या डोक्याएवढाच असतो, तसेच कुणाला काय वाटावे (किंवा त्याने वाटून घ्यावे) हा प्रश्नही ज्याच्या त्याच्या वकुबाचा असतो.
 
स्वभावाने, प्रकृतीने आणि लेखनधर्मानेही मूलत: गंभीर असणा-या मुकुंद टाकसाळे यांचे फेसबुकवर आगमन झाल्याला बरेच दिवस झाले. मध्यंतरी त्यांनी फेसबुकवर खूप वेळ वाया जातो, म्हणून तिथून एग्झिटही घेतली होती. पण त्यांना काय वाटले कुणास दखल, त्यांनी पुन्हा एंट्री मारली. सगळ्या गोष्टींकडे गंभीरपणे पाहणारी टाकसाळे यांच्यासारखी पाच-दहा लोकं फेसबुकवर सापडतात, तेव्हा बरेच वाटते. बुडत्याला काडीचा आधार असतो, तसा मराठी लोकांच्या फेसबुकवरच्या उठवळ भाऊगर्दीत टाकसाळे यांच्यासारखे काही लोक आधार असतात, असे आम्ही आपले सुरुवातीपासून मानत आलो. पण ‘मी कुठलीही गोष्ट गृहीत धरत नाही आणि इतरांनाही धरू देत नाही’ हे वाक्य कुठेतरी टाकसाळे यांच्या वाचनात आले असावे. ते त्यांनी लगेच अमलात आणायचे ठरवले. मात्र, त्यासाठी निवड केली ती फेसबुकची. त्यामुळे त्याचा बभ्रा व्हायचा तो झालाच.
 
तर गोष्ट अशी की, दिवाळी अगदी तोंडावर आल्यामुळे अनेक विक्रेत्यांनी सालाबादाप्रमाणे आपल्या दिवाळी अंकांच्या सवलत योजना जाहीर केल्या. त्यानुसार मॅजेस्टिकनेही आपला सवलत संच जाहीर केला. त्या संचात नेहमीप्रमाणे ‘मौज’, ‘दीपावली’, ‘अक्षर’, ‘कालनिर्णय सांस्कृतिक’, ‘महाराष्ट्र टाइम्स’ आणि ‘अनुभव’ या सहा दिवाळी अंकांचा संच आहे. संचाची 25 ऑक्टोबपर्यंत आगावू नोंदणी करणा-यांना तो सवलतीत दिला जाणार असून त्यासोबत ‘पोटच्या पोरी नाहीशा होत आहेत’ (गीता अरवामुदन), ‘राधेने ओढला पाय..’(मुकुंद टाकसाळे), ‘पुढल्या हाका..’ (सुबोध जावडेकर) आणि ‘आरोग्यसंपन्न आधुनिक जीवनाकरिता आयुर्वेद’ (शुभदा पटवर्धन) या चार पुस्तकांपैकी कुठलेही एक पुस्तक भेट मिळणार आहे.
 
..तर या संचाची जाहिरात मॅजेस्टिकने फेसबुकवर केली. त्यावर टाकसाळे यांनी 5 ऑक्टोबरला कमेंट केली की, ‘‘हा संच खरंच विकत घेण्याजोगा आहे. एक तर सारे अंक दर्जेदार आहेत. आणि त्याबरोबर दिली जाणारी पुस्तकंही दर्जेदार आहेत (इथे त्यांनी स्माइली टाकले आहे.) मी माझे पैसे पाठवले. तुम्ही???’’ त्यावर एक-दोन फेसबुकभाऊंनी लगेच, ‘आय अ‍ॅम नेक्स्ट’, ‘आय अ‍ॅम डुइंग सो’ अशी कमेंटाकमेंटी केली. प्रत्यक्षात संच बुक केला की नाही माहीत नाही. तर ते असो. पण अजून काही भाऊंनी आपल्या कोकरउडय़ा मारायच्या आधीच औरंगाबादच्या ‘जनशक्ती वाचक चळवळ’ या प्रकाशन-विक्री संस्थेच्या श्रीकांत उमरीकरांनी टाकसाळे यांच्यावर मोठा बॉम्ब टाकला. त्यांनी कमेंट केली, ‘‘मोठं आश्चर्य आहे! टाकसाळे यांचं स्व:चं पुस्तक या योजनेत आहे. ते मॅजेस्टिकचे लेखक आहेत. ललितमध्येही त्यांचं लेखन नियमित असते आणि तेच याची जाहिरात करत आहेत. आपले पुस्तक आपणच खरेदी करून त्याची जाहिरात लेखकाला करावी वाटत असेल तर याला काय म्हणावे? टाकसाळेंसारख्या वाङ्मयीन संस्कृतीची गंभीर जाण असणा-यांकडून तरी असले उठवळ चाळे अपेक्षित नाहीत.’’
 
उमरीकरांनी मुंबई-पुण्याबाहेरच्या प्रकाशकांना येणारे अनुभव, ग्रंथांच्या प्रसाराबाबतीतील अडचणी अशा ब-याच गोष्टींचा पाढा त्यानिमित्ताने वाचला. त्यावर परत काही फेसबुकभाऊंनी कोकरउडय़ा मारल्या-‘बरोबर आहे, बरोबर आहे’, ‘बरोबर नाही’.
 
आता फेसबुकवर आपल्या नावाने काय लाह्या फुटताहेत हे टाकसाळे यांच्या, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, उशिरा लक्षात आले. मग त्यांनी खुलासा केला, ‘‘श्रीकांत.. दिवाळी अंकांचा संच त्यांनी चांगला दिलेला आहे, हे खरंच आहे. त्यात माझं पुस्तक आहे, हा योगायोगाचा भाग. तो नसता तरी मी हेच लिहिलं असतं.. अनेकदा आपल्याला हवे ते अंक नेमके एकत्र नसतात. मग नाइलाज म्हणून कुठला तरी एखादा नको असलेला अंक गळ्यात मारून घ्यावा लागतो. तसं इथं होणार नाही. दर्जेदार दिवाळी अंक घेणा-यांना जे अंक नेमके हवे असतात, ते इथं आहेत, एवढंच मला म्हणायचं आहे..’’
 
टाकसाळे यांचा हा खुलासा वाचून ‘ज्युलिअस सीझर’ या शेक्सपिअरच्या नाटकातील सीझरचे ते प्रसिद्ध वाक्य - ‘ब्रूटस यू टू?’ - आठवले. टाकसाळे यांच्या गुणात्मक आणि दर्जेदार लेखनाबद्दल काहीच वाद नाही. म्हणूनच उमरीकरांनी त्यांच्याकडून सार्वजनिक विधानं करताना तारतम्याची अपेक्षा केली, ती वाजवीच म्हटली पाहिजे. पण टाकसाळे यांनी जो खुलासा केला तो, ब्रुटस यू टु? याचीच पुन्हा आठवण करून देणारा ठरला. कारण जे अंक अजून म्हणजे 5 ऑक्टोबरपर्यंत बाजारात आलेलेच नसणार, त्यांना न पाहताच, न वाचताच टाकसाळे यांनी केवळ पूर्वेतिहासावरून यंदाही ‘दर्जेदार’ ठरवून टाकले. दुसरी गोष्ट मॅजेस्टिकच्या संचात हे अंक निदान अलीकडच्या काही वर्षात तरी असतातच असतात, ते याच वर्षी आहेत, असे अजिबात नाही. म्हणजे गेल्यावर्षीपर्यंत हा संच दर्जेदार नसायचा की काय? शिवाय ‘मौज’चा अंक आहे म्हणून तो दर्जेदारच आहे किंवा ‘अक्षर’ आहे म्हणून तो दर्जेदारच आहे, असा दावा करणं (प्रकाशनाआधीच तरी) वस्तुस्थितीला धरून नाही. आता ज्या अंकांत एखाद-दुसरा चांगला लेख (किंवा कथा) तो अंक दर्जेदार अशी तर टाकसाळे यांची दर्जाची व्याख्या नाही ना? पण अंक प्रसिद्ध व्हायच्या आधीच त्यांना सर्टीफिकेट देणे हा त्यांच्या पूर्वपुण्याईचा भाग की दबदब्याचा? आणि त्याला टाकसाळे यांनी भुलावे?
टाकसाळे यू टू?
हेच या संचासोबत भेट मिळणा-या पुस्तकांबाबतही आहे. प्रत्येक संचासोबत चारपैकी आपल्या आवडीचे कोणतेही एकच पुस्तक भेट मिळणार आहे. पण टाकसाळे यांनी सा-याच पुस्तकांना मिष्किलपणे का होईना पण दर्जेदार ठरवून टाकल्याने पंचाईत झाली आहे. कारण संचासोबत चारही पुस्तकं भेट मिळणार नाहीत. थोडा निर्लज्जपणा करून मागितली तरी मॅजेस्टिकवाले म्हणणार, ‘साहेब, संच घ्यायचा तर घ्या, नाहीतर फुटा.’ म्हणजे उरलेली तीन पुस्तकं विकत घ्यावी लागणार!
 
त्यात टाकसाळे आयुर्वेदावरच्या पुस्तकालाही दर्जेदार ठरवून मोकळे झाले आहेत. त्यात खरेही आहे म्हणा. कारण संच विकत घेणारे बहुतांश लोक उपयुक्तता मूल्य पाहून भेट पुस्तक म्हणून याच पुस्तकाची निवड करणार. त्यामुळे उरलेल्या तिन्ही पुस्तकांना टाकसाळे यांनी दर्जेदार ठरवूनही त्याचा फारसा फायदा होणार नाही.
 अहो, टाकसाळे आपले शब्द किमान वाया जाणार नाहीत, याची तरी काळजी घ्या. बाकी चूकभूल द्यावी घ्यावी लागतेच हो!

Sunday 9 October 2011

प्रगटोनी नासावे हे बरे नव्हे

साहित्य संमेलनाची नौका एकदाची चंद्रपूरच्या किना-याला लागली तेव्हा किमान काही साहित्य रसिकांनी सुटेकचा श्वास घेतला असेल, काहीनी उच्छवासही टाकला असेल. आता संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी कोण कोण उभं राहणार, याची उत्सुकता काहींना दरवर्षीप्रमाणे लागली आहे. मागच्या आठवडय़ात ज्येष्ठ समीक्षक वसंत आबाजी डहाके यांनी मराठी साहित्य परिषद, पुणे आणि मुंबई साहित्य संघ या दोन्ही ठिकाणांहून आपल्या उमेदवारीचा अर्ज भरला आहे. विदर्भातल्याच लेखिका प्रतिमा इंगोले यांनी अर्ज भरला आहे. याशिवाय विठ्ठल वाघ, सुरेश द्वादशीवार यांचीही नावं चर्चेत आहेत. चंद्रशेखर धर्माधिकारी यांनीही या मैदानात आश्चर्यकारकरित्या उडी घेतली आहे. पण नेहमीप्रमाणे आपल्या खुज्या अस्मितांचं प्रदर्शन करणारी - म्हणजे संमेलन विदर्भात आहे तर विदर्भातलाच संमेलनाध्यक्ष हवा - अशी चर्चाही सुरू झाली आहे. अलीकडच्या काळात सोलापूर, सांगली, पुणे, ठाणे अशा ठिकाणी झालेल्या साहित्य संमेलनाच्या वेळीही ही चर्चा होतीच. एकीकडे मराठी ज्ञानभाषा करायच्या बढाया मारायच्या, मराठी सातासमुद्रापार पोहचल्याच्या गप्पा करायच्या आणि प्रत्यक्षात मात्र साहित्य संमेलनाचं नेतृत्व करायची वेळ आली की, आपल्याच भागातला संमेलनाध्यक्ष हवा, असा आग्रह धरायचा! हा सरळ सरळ दुटप्पीपणा आहे. यातून आपण आपल्या संकुचित आणि प्रादेशिक मनोवृत्तीचंच दर्शन घडवत आहोत याचंही साधं भान ठेवायचं नाही!!
 
त्यामुळे या प्रकारातून संमेलनाध्यक्ष या पदाचंच अवमूल्यन होत आहे, हेही कुणाच्या लक्षात येत नाही. कुणाला ते जाणून घेण्याची इच्छाही नाही, हे सर्वात दु:खद आहे. मराठी साहित्य संमेलन हे किमान नावावरून तरी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनआहे. याचा अर्थ असा होतो की, भारतात जिथं जिथं मराठी लोक आहेत, ते सर्व या संमेलनात सहभागी होतील, किमान त्यांनी सहभागी व्हावं. त्यामुळेच सुरुवातीच्या काळापासून हे संमेलन महाराष्ट्राबाहेर घेण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला गेला. 1909 साली बडोद्यापासून ही सुरुवात झाली, ती पुढे ग्वाल्हेर, बेळगाव, हैदराबाद, इंदूर, अहमदाबाद, दिल्ली, भोपाळ, रायपूर, पणजी, अशा ठिकाणी संमेलने भरवण्यापर्यंत विस्तारत गेली. पण 2001  साली विजया राज्याध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली इंदूरला संमेलन झालं आणि तिथपासून संमेलनाचा परीघ आक्रसून तो महाराष्ट्रापुरताच मर्यादित झाला.
 
यावर्षी आधी बडोद्याहून निमंत्रण आल्यानं हे केंद्र परत महाराष्ट्राबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली होती, पण मराठी माणसं महाराष्ट्राच्या बाहेर गेली म्हणून त्यांच्या क्षुद्र महत्त्वाकांक्षा सुधारल्या असं होत नाही. महाराष्ट्रातल्या यच्चयावत साहित्य संस्थाप्रमाणे बडोद्याचीही संस्था वैयक्तिक हेवेदावे आणि कुरघोडीच्या राजकारणानं पोखरली असल्यानं त्याचं पर्यवसान सुंदोपसुंदीत होऊन अखेर त्यांना संमेलन भरवण्यात असमर्थता व्यक्त करावी लागली. मग संमेलन घेता का संमेलन?’ म्हणत साहित्य महामंडळाला अनेकांच्या नाकदुऱ्या काढाव्या लागल्या. शेवटी ते एकदाचं चंद्रपूरने संमेलन भरवण्याचं निमंत्रण स्वीकारलं. पण विदर्भातल्या साहित्याच्या स्वयंघोषित रखवालदारांना संमेलनाध्यक्षही त्यांचाच हवा आणि संमेलनही त्यांच्याच गावात हवं. ही कोती मानसिकता फक्त विदर्भातच आहे, असंही नाही. अलीकडच्या काळात संमेलन भरवलेल्या सगळ्याच शहरं-गावांनी ती त्या त्या वेळी जाहीर केलेली आहे. आताही विदर्भ साहित्य संघानं आपला पाठिंबा धर्माधिकारींना जाहीर करून स्वत:चं बौद्धिक दारिद्र्य उघड केलं आहे.
 
असाच प्रकार चालू राहणार असेल तर संमेलनाच्या नावातून अखिल भारतीयहे दोन शब्द काढून टाकले पाहिजेत. आपलं जग इतकं मर्यादित असेल तर आपण किमान सर्वसमावेशकतेच्या गावगप्पा मारू नयेत. कारण त्यातून आपलीच यत्ताउघड होते.
 
दुसरी गोष्ट म्हणजे संमेलनाध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी आपला बेलगाम घोडा दामटवण्याचा प्रयत्न चालवला आहे. ते मूळचे विदर्भाचे आहेत, त्यामुळे त्यांना हे ब्लॅकमेलिंग जमण्याची शक्यता खुणावू लागली आहे. पण त्यांना सर्वसंमतीनं आणि निवडणूक न होता म्हणजे बिनविरोध संमेलनाध्यक्षपद हवं आहे. याचे तीन अर्थ होतात. एक, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती राहिलेल्या धर्माधिकारींचा लोकशाही मार्गानं होणाऱ्या निवडणुकीवर विश्वास नसावा वा निवडणूक घेतली तर आपण निवडून येऊ याची त्यांना खात्री वाटत नसावी. दोन, धर्माधिकारी यांनी स्वत:च असं जाहीर करणं म्हणजे आपलं कर्तृत्व वादातीत आहे, तेव्हा त्याला सर्व साहित्य रसिकांनी मान्यता द्यायला हवी. तीन, धर्माधिकारी विदर्भाचेच असल्याने त्यांना सहानुभूती मिळेलही. पण त्यांची साहित्यिक कामगिरी संमेलनाच्या अध्यपदावर दावा सांगण्याएवढी आहे काय? आपले वडील (गांधीवादी नेते) दादा धर्माधिकारी यांची पूर्वपुण्याई एवढेच धर्माधिकारांचे  भांडवल आहे. त्यांनी काही पुस्तकं लिहिली असली तरी त्याला कुणीही साहित्य म्हणणार नाही आणि एवढी एकच गोष्ट गुणवत्तेच्या पातळीवर निर्विवाद होण्यासारखी नाही. शिवाय धर्माधिकारी सध्या एका सरकारी समितीचे काम पाहतात. त्यामुळे त्यांनी खरं तर संमेलनाध्यक्षपदाची इच्छा बाळगणं, हेच मुळात न्याय्य नाही आणि नैतिक तर नाहीच नाही. माझं आडनाव धर्माधिकारी असल्यानं मला कुठल्याही विषयावर बोलण्याचा अधिकार आहेअसं आपल्या भाषणांत उच्चरवानं सांगणा-या आणि त्या भाषणांत आपल्या वडिलांपासून पत्नीपर्यंत आणि मुलांपासून नातवंडांपर्यंत सर्वाची सदासर्वदा स्तुती करणा-या आत्मलुब्ध आणि आत्ममग्न धर्माधिकारींचं हे वर्तन त्यांचीच शोभाकरणारं आहे. त्यामुळे त्यांनी
 
अभ्यासेनी प्रगटावे ।
ना तरी झाकोनी राहावे ।
प्रगटोनी नासावे ।
हे बरे नव्हे ।।
हे समर्थवचन लक्षात ठेवावं.. आणि संमेलनाध्यक्ष विदर्भातलाच हवाअसे अकलेचे तारे तोडणा-यांनीही.