Friday 6 April 2012

संजय जोशींनी ओढला पाय...


मार्चच्या अंकातील `लक्षवेधी पुस्तके' या सदरातील संजय भास्कर जोशी यांनी `राधेने ओढला पाय...' (मुकुंद टाकसाळे), `असा बालगंधर्व' (अभिराम भडकमकर), `कथनात्म साहित्य आणि समीक्षा' (हरिश्चंद्र थोरात) आणि `कायमचे प्रश्न' (रत्नाकर मतकरी, संपादन मुकुंद कुळे) या चार पुस्तकांविषयी लिहिलेला मजकूर वाचला. `लक्षवेधी पुस्तके' हे पुस्तकांचा परिचय करून देणारे आहे की त्यांची समीक्षा करून देणारे की त्या पुस्तकांच्या निमित्ताने लिहिणाऱयाची विद्वता सांगणारे आहे, याचा थांगपत्ता बऱयाचदा लागत नाही, म्हणून `पुस्तकांविषयी लिहिलेला मजकूर' असा उल्लेख केला आहे.
मार्चच्या अंकातील वरील चारही पुस्तकांविषयी संजय भास्कर जोशी यांनी लिहिलेला मजकूर वाचून तोच प्रश्न पुन्हा पडला. कारण चारही पुस्तकांविषयी त्यांनी जे काही लिहिले आहे, त्यात त्यांचे हितसंबंध आणि खुशामतखोरपणा उघड उघड दिसतात. त्यातही मुकुंद टाकसाळे यांच्या पुस्तकाविषयी जोशींनी जे काही लिहिले आहे, त्यात त्यांचा टाकसाळे यांच्याविषयीचा द्वेष स्पष्टपणे जाणवतो. त्याला त्यांनी विनोदाचे गोंडस रूप दिले आहे, एवढेच!
इथे मुकुंद टाकसाळे यांच्या पुस्तकाची भलामण करण्याचा अजिबात हेतू नाही आणि त्याविषयी काही लिहिण्याचेही कारण नाही. हे पत्र लिहिण्याचे कारण एवढेच आहे की, `राधेने ओढला पाय...' हे पुस्तक टाकसाळे यांच्या याआधीच्या पुस्तकापेक्षा फारसे चांगले नाही, असा संजय जोशी यांचा दावा आहे; तर मग ते `लक्षवेधी पुस्तके'साठी का निवडले? की या मासिकाचे संपादक आणि टाकसाळेंचे प्रकाशक असलेल्या अशोक कोठावळे यांनी ते जोशींना मुद्दामहून निवडायला सांगितले? कि संजय जोशींनी स्वत:हून निवडले? बरे निवडले तर निवडले, ते वाचल्यावर तरी हे पुस्तक `लक्षवेधी'मध्ये घेता येण्यासारखे नाही, हे त्यांच्या लक्षात आले नाही काय? आले असेल तर त्यांनी तसे कोठावळे यांना सांगितले काय? की तरीही कोठावळे यांनी त्यावर लिहिण्यासाठी जोशींवर दबाव आणला?
`ललित'चे संपादक म्हणून कोठावळे आणि `लक्षवेधी'चे लेखक म्हणून जोशी या दोघांनीही याचा खुलासा करतील काय?
कुठल्याही लेखकाची सगळीच पुस्तकं काही चांगली नसतात, हे जगजाहीर आहे! आणि त्यात आवर्जुन नोंदवावे असे काही नाही! श्री. ना. पेंडसे यांनी आपल्या शेवटच्या काळात लिहिलेली `घागर, रिकामी रे वनमाली' ही कादंबरी अतिशय वाईट होती. श्री. . माटे यांची एकमेव कादंबरी आणि कथा यांच्यापेक्षा त्यांचे निबंधलेखन कितीतरी सरस आहे. पण यावरून कुणी पेंडसे आणि माटे यांना मोडीत काढणार नाही. उलट त्यांचे आधीचे लेखन पाहून या पुस्तकांकडे एकतर सहानुभूतीने पाहिल किंवा त्याविषयी बोलणार नाही. हा सभ्यतेचा संकेत असतो. आणि तो पाळायचा असतो. संजय जोशींनी तो मुकुंद टाकसाळे यांच्याबाबतीत पाळलेला नाही. उलट त्यांनी आपला जुना हिशोब चुकता केला आहे, असेच मत त्यांचा हा मजकूर वाचून कुणाचेही होईल. नाहीतर त्यांनी टाकसाळे यांच्या पुस्तकाविषयी लिहिताना त्यांना जयंवत दळवी यांनी `चिंवि जोशींचा वारसदार' म्हटले ते कसे बरोबर नाही, याची उठाठेव करण्याचे कारण नव्हते! आणि ब्लर्ब काय लिहिले आहे, यावरच सारा भर द्यायचेही कारण नव्हते!! ब्लर्ब ही काही पुस्तकाच्या गुणवत्तेची एकमेव खूण नसते, तर ती केवळ पुस्तकाकडे वाचकाचे लक्ष वेधून घेण्याची एक क्लृप्ती असते. पण जोशींनी त्यावरून टाकसाळे यांनी इतके धारेवर धरले आहे की, त्यांच्या हेतूविषयीचा संशय बळावतो!
याच अंकात पान 15वर मॅजेस्टिकने नुकत्याच प्रकाशित केलेल्या `लीली' या पहिल्या इंग्रजी पुस्तकाची जाहिरात आहे. त्यात संजय जोशी यांचा अभिप्राय छापला आहे. त्यात जोशी या पुस्तकाविषयी लिहितात, `ही कादंबरी `बुकर'च्या योग्यतेची आहे.' ज्या माणसाला `बुकर'च्या तोडीचे काय आहे, हे चांगल्या प्रकारे समजू शकते, त्याला `लक्षवेधी पुस्तक' कुठले आहे आणि कुठले नाही, हे समजायलाही फारशी अडचण येऊ नये
आजकाल कुठल्याही गोष्टींविषयी आपले मत व्यक्त करणे म्हणजे नवे शत्रू तयार करणे असते. टीका प्रांजळपणे स्वीकारण्याऐवजी `त्याला काय अधिकार आहे?' असा प्रश्न विचारून स्वत:ची सुटका करून घेता येते. कारण असा प्रश्न उपस्थित करून आपण सर्वांना मोडीत काढू शकतो, आपल्या हितशत्रूंची पुस्तके निवडून त्याआडून त्यांच्यावर शरसंधान करू शकतो. शिवाय इतरांचा वकुब-लायकी काढली की आपोआपच आपला वकुब-लायकी वाढते. निदान मराठीमध्ये लिहिणाऱया आणि समीक्षक म्हणवल्या जाणाऱयांची तरी! त्याला काही इलाज नाही. पण असे प्रकार जवळपास एकोणपन्नास वर्षांची परंपरा असलेल्या `ललित'मधून तरी होऊ नयेत, एवढीच किमान अपेक्षा आहे! त्याकडे `ललित'च्या संपादकांनी जरा लक्ष द्यावे ही विनंती!

No comments:

Post a Comment