Sunday 25 December 2011

25-50-75=0

डॉ. मनोहर गजानन जोशी यांचे 25-50-75हे आत्मचरित्र वाचून सध्या आमची ब्रह्मानंदी टाळी लागली आहे! यातल्या प्रत्येक आकडय़ानंतरच्या डॅश या वजाबाकीचेच चिन्ह असावेत असं पुस्तक वाचून वाटू लागतं. पण तो आपला नुसता अंदाज. कारण या आत्मचरित्राला महाराष्ट्राचे आधुनिक बखरकार बाबासाहेब पुरंदरे यांनी प्रस्तावना लिहिली आहे. बाबासाहेब हाडाचे दुर्गप्रेमी असल्याने ते सतत या दुर्गावरून त्या दुर्गावरच ये-जा करत असतात. ही प्रस्तावनाही त्यांनी अशीच दुर्गादुर्गी ये-जा करताना लिहिली असावी! त्यात बाबासाहेबांचं शब्दलालित्य म्हणजे काय बहार राव? ते लिहितात, ‘तेव्हा शब्दांची फलटणच्या फलटण हात जोडून त्यांच्या समोर उभी राहते आणि म्हणते मला घ्या, मला घ्या.अतिशयोक्ती, आत्मस्तुती, खोटा विनय, स्वत:ची खोटी वकिली अशा गोष्टी जोशीसाहेबांनी टाळल्या आहेत असा निर्वाळा बाबासाहेबांनी देऊन टाकला आहे. बाबासाहेबांपुढे जायची कुणाची बिशाद आहे राव? त्यामुळे आम्ही सर्व मजकूर वाचून  काढला आणि त्यात कुठेही अतिशयोक्ती, आत्मस्तुती, खोटा विनय, स्वत:ची वकिली अशा गोष्टी औषधालासुद्धा शोधून सापडणार नाहीत अशा निष्कर्षावर आलोत.
जोशीसाहेबांनी पुस्तकाचे जसे बालपण, तारुण्य आणि वृद्धत्व याननुसार तीन भाग करून त्यात आपल्या आयुष्याची 25-50-75 वर्षाची वाटणी करून टाकली. त्यानुसार पुस्तकाचा मजकूर लिहिला आणि त्याच संख्येत स्वत:चे फोटोही सोबत छापले. जोशीसाहेबांचे स्वत:वर जसे निस्वार्थी आणि विनयशील प्रेम आहे तसेच त्यांचे इतर अनेक गोष्टींवरही प्रेम आहे. कारण त्यांची दृष्टीच मुळात भूतदयावादी आहे. त्यामुळे 150 पाने मजकुराची आणि 150 पाने फोटोंची अशी त्यांनी सरळ विभागणी केली आहे. या छायाचित्रांमध्ये सापशिडीचा खेळ, कुलदेवता अंबेजोगाई, ग्रामदेवता बापूजी, ग्रामदेवता अंबामाता, रायगड, गरम पाण्याचे झरे, महाड-पनवेलची शाळा, हुतात्मा स्मारक, बॅ. अंतुले, मुंबई महानगरपालिका, मार्टिन ल्यूथर किंग, येरवडा जेल, नायगरा धबधबा, इंदिरा गांधी, महाराष्ट्र विधानपरिषद, कुसुमाग्रज, मुंबई उच्च न्यायालय, बाबरी मशिद, एन्रॉनच्या रिबेका मार्क, सर्वोच्च न्यायालय, गिरीश व्यास यांची पुण्यातील वादग्रस्त इमारत, संसद भवन यांच्याही छायाचित्रांचा समावेश आहे. या सर्वाना सन्मानपूर्वक आपल्या आत्मचरित्रात स्थान दिल्याबद्दल त्यांनी जोशीसाहेबांना रॉयल्टी द्यायला हवी. शिवाय त्याचं स्थानही स्वयंभू आहे. त्यात जोशीसाहेब कुठेही अध्येमध्ये कडमडलेलेनाहीत. इतरांवरही प्रेम असावं तर असं. फक्त त्यात जोशीसाहेबांच्या नावे बाकी शून्य उरतं एवढाच काय तो बारकासा तोटा. पण एवढय़ा मोठय़ा कोहिनूरच्या मालकासाठी एवढुसा तोटा, किस झाड की पत्ती! 

No comments:

Post a Comment