Sunday 25 September 2011

संमेलनाची ससेहोलपट!

बडोद्याच्या साहित्य परिषदेनं आधी संमेलनाचं निमंत्रण स्वीकारून नंतर नाकारल्यावर त्या परिषदेच्या नेतृत्वाचा हेकेखोरपणा उघड झाला, तशीच साहित्य महामंडळाची दिवाळखोरीही. औरंगाबादमधील उंडणगाव या छोटय़ा गावानंही साहित्य संमेलन भरवल्याची तयारी दाखवली होती. पण एवढय़ा छोटय़ा गावी संमेलन कसं भरवायचं म्हणून त्यांच्या आमंत्रणाचा विचार करता येणार नाही असं महामंडळानं कळवल्यावर त्या गावच्या ग्रामस्थांनी कौतिकराव ठाले पाटील यांचा पुतळा जाळला. खरं तर आता काही कौतिकराव महामंडळाचे अध्यक्ष नाहीत. उषा तांबे यांच्याकडे अध्यक्षपदाची खुर्ची आहे. पण तांबेबाई पडल्या भिडस्त, त्यामुळे ठाले पाटलांची तोंटपाटीलकी आणि दांडगटशाही यांना काही त्या लगाम घालू शकत नाहीत. त्यामुळे ठाले पाटील यांचाच महामंडळावर प्रभाव आहे. शिवाय संपर्क ही प्रभावाची आणि राजकारणाची गुरुकिल्ली असते. तेही ठाले पाटलांकडे आहेच. ठाले पाटील पक्के राजकारणी गृहस्थ आहेत. अन्यथा साहित्य संमेलनाची नौका चंद्रपूरच्या किना-यालाही लागणं शक्य नव्हतं. विदर्भातली साहित्य परिषद आणि ठाले पाटील यांच्यामधून विस्तव जात नव्हता, ही परिस्थिती भूतकाळातली नाही तर अलीकडच्या वर्तमानकाळातलीच आहे. या परिषदेचा विदर्भात बराच दबदबा आहे. त्यांनी ‘विदर्भात कुठेही साहित्य संमेलन भरू देणार नाही’ असा पण केला असता आणि प्रयत्न केले असते तर त्यांना ते अवघड नव्हतं. पण ठाले पाटीलांशी जुनं वैर फेडायचं सोडून त्यांनी जुळवून घेतलं. शिवाय तांबेबाईंशी काही त्यांचं वाकडं नाही. वाकडय़ात न शिरणा-या कुणाशीच कुणाचं वाकडं नसतं, हा सरळ नियम विदर्भवाल्यांचा असावा. पण बडोद्याच्या नकारानंतर संमेलन भरवण्यासाठी महामंडळाला अनेकांच्या नाकदु-या काढाव्या लागल्या ही वस्तुस्थिती आहे. हे त्यांच्या दारिद्रय़ाचं लक्षण की महाराष्ट्राच्या? खरं तर ते महामंडळाच्याच म्हटलं पाहिजे. कारण दुस-या दर्जाची माणसं तिय्यम दर्जाचीच कामगिरी करत असतील तर त्यांच्याविषयी कुणाला आस्था असण्याचं काय कारण?
 पण संमेलन चंद्रपुरात होत आहे या बातमीनं काही कुणाला फार आनंद झालेला दिसत नाही. चंद्रपूर शहर जिल्ह्याचं ठिकाण असलं तरी तसं ग्रामीणच. शिवाय काहीसं दुर्गम. त्यामुळे तिथं जायला किती साहित्यिक तयार होतील हाही प्रश्नच आहे. शिवाय विदर्भामध्ये अलीकडे जी फुटून निघण्याची भाषा काही थोडय़ाथोडक्यांकडून केली जात आहे, त्यांचे नगारे या संमेलनात वाजण्याची दाट शक्यता आहे. साहित्य संमेलनाला आता राजकारणाचं वावडं राहिलं नाही हे खरं पण ‘ज्या गावच्या बोरी त्या गावच्या बाभळी’ या न्यायानं विदर्भाच्या लोकांनी संमेलनाचा अध्यक्ष विदर्भातलाच हवा अशी मागणी केली तर पुण्या-मुंबईतल्या काही असंतुष्ट आत्म्यांची या वर्षीचीही संधी बोंबललीच की! आधीच संमेलनाध्यक्षपद रूढार्थानं साहित्यिक नसणा-याकडं गेलं, ते खेचून परत सर्जनशील लेखकांकडे आणायचं असा पण काहींनी केलेला आहे, असंही म्हटलं जातं. त्यामुळे आता संमेलनाच्या मांडवाखाली कुणाची पालखी दाखल होते, ते पाहायचं. साल्लं, विदर्भ, त्यात चंद्रपूर का काय म्हणत्यात, तिथं नक्षलवाद्यांचं भ्या असतं का राव? अध्यक्षपद मिळायचं पण एकाद्या नक्षलवाद्यानं नरडय़ाला बंदूक लावली तर कितीला पडायचं ते अध्यक्षपद? जरा, चौकशी केलेली बरी म्हणून काही लोक त्या परिसराचा भूगोल समजून घेत आहेत असं म्हणतात!

Tuesday 6 September 2011

संतापकीय २८ ऑगस्ट


संतापकीय ३१ जुलै


संतापकीय १७ जुलै


संतापकीय ३ जुलै


संतापकीय १९ जून


संतापकीय ५ जून


संतापकीय २२ मे


संतापकीय ८ मे


संतापकीय २४ एप्रिल


संतापकीय १० एप्रील


संतापकीय २७ मार्च


संतापकीय १३ मार्च


संतापकीय २७ फेब्रुवारी २०११