Monday 7 November 2011

लाडक्यांचे दोडके

आठ नोव्हेंबर हा पु. ल. देशपांडे यांचा स्मृतिदिन. पुलं आता हयात असते तर 92 वर्षाचे झाले असते. पण अकरा वर्षापूर्वीच त्यांनी त्यांच्या लग्नाच्या तारखेला म्हणजे 12 जून 2000ला इहलोकाचा निरोप घेतला. त्याआधीची दहा वर्षे पुलंची होती असंही म्हणता येत नाही. कारण पार्किन्सनसारख्या आजाराशी आणि आयुष्यभराच्या दगदगीतून आलेला थकवा यांच्याशी सामना करण्यात त्यांचा तो शेवटचा काळ गेला. शिवाय त्यांचं गारुडही तेव्हा वयोपरत्वे ओसरलं होतंच. म्हणजे पुलंना जागतिकीकरणाचा तसा काही स्पर्श झालेला नव्हता. नव्वदच्या दशकात जागतिकीकरणाला सुरुवात झाली असली तरी, त्याची दृष्यरूपं ख-या अर्थानं जाणवू लागली ती 2000नंतर. तेव्हा तर पुलं आपल्यात नव्हतेच.
 
प्रसिद्धीच्या झोतात असलेली एखादी मोठी व्यक्ती गेली की, सर्वसाधारणपणे ‘..मोठी पोकळी निर्माण झाली’, ‘..मोठी हानी झाली’, ‘..न भरून येणारं नुकसान झालंअशी वाक्यं कोण कोण उच्चारत असतं. पुलं गेल्यावरही ती पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या लोकांकडून ऐकवली, लिहिली आणि उच्चारली गेलीच. पण खरी पोकळी, खरी हानी आणि खरं नुकसान झालं ते सुनीताबाईंचंच. शेवटी सात नोव्हेंबर 2009ला सुनीताबाईही गेल्या. म्हणजे आता त्यांना जाऊनही दोन वर्षे होतील.
 आता पुलं आणि सुनीताबाई यांच्या वाङ्मयीन कारकीर्दीचा लसाविमसावि काढला तर काय निघतं, याच्याशी कुणाला काही सोयरसुतक दिसत नाही. आताही पुलंचं लिखाण वाचताना कुणाकुणाच्या पापण्यांच्या कडा ओलावत असतील किंवा तसे ओलावणारे लोक आपला अनुभव सांगायला पुढे येतील. शिवाय कुणाचं काहीही न वाचता, त्याच्या साहित्याबद्दल बेधडक विधानं करायची अशी हल्ली महाराष्ट्रात फॅशन आहेच. त्यात ती व्यक्ती हयात नसली की, मग थापांना पारावारच नसतो.
दुसरं म्हणजे पुलं आपल्याला हसवताहेत ना, मग हसून घ्या; पुलं टाळ्या घेणारी वक्तव्ये करताहेत ना, मग वाजवा टाळ्या; पुलंना सर्दी झालीय ना, मग काढा शिंका असा संपद्राय त्यांच्या हयातीत निर्माण झाला. कारण या लोकांना आपल्या अडाणीपणाला मानवणारंच पुलंचं व्हर्जनच हवं होतं. तेवढीच त्यांची अपेक्षा होती आणि आहे.
 
त्यामुळे पुलं गेल्यानंतरच्या अकरा वर्षात पुलंचे तथाकथित महोत्सव, पुलं सन्मान पुरस्कार आणि पुलकित सकाळी किंवा संध्याकाळी यांचं पेव फुटत राहिलं. एकुणात पुलंचा इव्हेंट करण्याचा कार्यक्रम बिनबोभाट चालू राहिला. खरं म्हणजे पुलं काही जागतिकीकरणाचं प्रॉडक्ट नाहीत, पण जागतिकीकरणात स्वत:चं गि-हाईककरून घेतलेल्या लोकांनी पुलंचं प्रॉडक्टीकरण केलं!
 
जेजुरीला जसा खंडोबा-म्हाळसाबाईच्या नावानं बेलभंडारा उधळून उधळून तिथली माणसं हळदीच्याच रंगाची होऊन जातात आणि मग त्यांच्या कपडय़ावरून, चेह-यावरून त्यांना ओळखणं दुरापास्त होतं, तसंच पुलंच्या नावाचा बेलभंडारा उधळून स्वत:ची पोळी भाजवणा-यांचंही आहे. ते सगळे एकसारखेच दिसायला लागले आहेत. त्यात काहीच फरक दिसत नाही. म्हणजे हे पिठाच्या गिरणीसारखं आहे. त्यात गहू टाका, ज्वारी टाका, बाजरी टाका, सगळ्यांचं एकसारखंच पीठ होणार! आणि तेच लोक आपली पाठ आपणच थोपटून घेत राहणार! पुलं माणूस म्हणून मोठे होतेअसं सामान्य विधान नाना पाटेकर करतात, आणि वृत्तवाहिन्या त्यांचं पुल महोत्सवातलं आख्खं भाषणच ऐकवतात. हल्ली नाना कुठल्याही कार्यक्रमात गेले की, मला नाटकात काम करायचंय, अमुकचं नाटक करायचंय, तमुकची भूमिका करायचीय, असं म्हणून लोकांच्या टाळ्या घेतात. पण प्रत्यक्षात काहीच करत नाहीत. तरीही नाना बोलतात त्याची बातमी होते.  
 
तर मुद्दा आहे, पुलंच्या नावानं जगणा-या लोकांचा. श्रीकांत मोघेंसारखे लोक पुलंच्या नावावरच मोठे झाले आणि पुण्याचा आशय फिल्म क्लबनं पुलं महोत्सव करून बरेच पुलं सन्मान पुरस्कार वाटले. आता त्यांना कंटाळा आला असावा किंवा कार्यक्रमातून पुरेसा पैसा मिळत नसावा. पण कार्यक्रम काही बंद पडले नाहीत. ते चालूच आहेत.
 
या लोकांना पुलंचे दोडकेम्हणायला हरकत नाही. कारण त्यांनी पुलंना महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्वअशी महोमहापाध्यायतोडीची उपाधी दिली आहे. कुणी म्हणेल की हा फार सोयीस्करपणा झाला. पण तो फायद्याचा आहे. कारण पुलंच्या नावाचं दुकान मांडून आपला गल्ला भरता येतो. पुलंच्या साहित्यिक योगदानाचा लसाविमसावि काढायचा तर त्यांची पुस्तकं वाचावी लागणार, एकदाच नाहीतर पुन्हा पुन्हा वाचावी लागणार, पुलंच्या बहराचा काळ आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक गुणवत्ता यांचा अभ्यास करावा लागणार. एवढा वेळ कुणाकडे आहे? नाहीतर आतापर्यंत पुलंचं एखादं किमान वाचनीय म्हणावं इतपत बाळबोध चरित्र तरी कुणी लिहिलं नसतं का? महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व एखाद्या बाळबोध चरित्राचाही विषय होऊ नये?
 
पुलंनी हेमिंग्वेच्या ओल्ड मॅन अँड द सीया जगप्रसिद्ध पुस्तकाचा एका कोळियानेया भनगड नावाने अनुवाद केला. पुलं मलाव्यच असल्यामुळे त्यांच्या दोडक्यांनी त्याच्याविरोधात ब्रही काढला नाही. आणि बहुधा ते वाचलंही नसावं. पण त्यांना एका कोळियानेहे शब्द एवढे आवडले की, ‘एका खेळियाने’, ‘एका साळियानेअशी ढापाढापी चालू केली.
 त्यामुळे पुलंची श्रीशिल्लक अशाच पद्धतीने राहणार यात काही वाद नाही. पुलं त्यांच्या नावानं टाळकुटय़ा आणि मेणबत्त्या पेटव्या लोकांचेच उत्सवमूर्ती राहणार! कारण तीच त्यांची खरी ओळख. त्यांचं साहित्यिक म्हणून काहीएक योगदान होतं का, याच्यापेक्षा पुलं परफॉर्मर होते, हे मिरवायला सोपं आणि सोयीचं आहे. त्यामुळे त्यांच्या नावे महोत्सव करता येतो. त्यामुळे पुलंच्या नावाने उत्सव होत राहतील, त्यांच्या नावे पुरस्कार दिले जातील, त्यांच्यासारखा गेटअप करून त्यांचे एकपात्री प्रयोग सादर होतील, त्यांची जवळपास सगळी परभृत नाटकं पुन्हा पुन्हा नव्या संचांत येत राहतील. पण पुलंचं पुन्हा पुन्हा पुनर्मूल्यांकन करायला फारसं कुणी (त्यातल्या त्यात शहाणा माणूस!) धजावणार नाही. भविष्यकाळात कुणी तसा प्रयत्न केलाच तर (व्यक्ती आणि वल्लीआणि मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहासही दोन पुस्तकं वगळता), हेमिंग्वेच्या ओल्ड मॅन अँड द सीमधल्या म्हाता-याच्या हाती शेवटी माशाच्या हाडांचा सापळाच उरला तसाच सापळा उरेल. हे जाणून असलेले लोक त्या मार्गाला जाणार नाहीत आणि गेले तरी ते मान्यही होणार नाही. त्यामुळे पुलंचे सोंगाडेआणि बाताडेहेच व्हर्जनच टिकून राहणार. ते पुलंचंच प्रारब्ध असल्यानं त्याला तुम्ही-आम्ही काय करणार?

No comments:

Post a Comment