Sunday 20 November 2011

सुन्या सुन्या मैफलीत...

मराठी साहित्यक्षेत्रात सध्या ज्यामच सन्नाटा पसरला आहे. ‘बीभत्स गारठा’, ‘कानठळ्या बसवणारी शांतता’, ‘टाचणी पडली तरी आवाज ऐकू येईल अशी भयाण शांतता’ असंच या सन्नाटय़ाचं वर्णन करावं लागेल. या गोष्टीला दोन माणसं कारणीभूत आहेत. ती म्हणजे साहित्य संमेलनाध्यक्षपदाचे उमेदवार वसंत आबाजी डहाके आणि प्रतिमा इंगोले. 16 डिसेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार. म्हणजेच आता मतपत्रिका मतदारांना रवाना केल्या गेल्या आहेत. पण ना निवडणुकीच्या प्रचारात रंग भरला जातो आहे ना कुणी काही वाद निर्माण होतील अशी विधानं करत आहे. अशानं कसं होणार हो? संमेलनाची हवा तापणार तरी कशी?
 
दरवर्षी उमेदवारांच्या अर्ज भरण्याच्या तारखा जाहीर झाल्या की काही ना काही चर्चा, गावगप्पा आणि अफवा पसरायला सुरुवात होते..आणि त्याचबरोबर संमेलनाच्या वातावरण निर्मितीची रंगीत तालीम सुरू होते. कोण बेळगावचा प्रश्न सोडवण्याचं जाहीर करतं, तर कोण प्रत्यक्ष साहित्य महामंडळावरच टीकेची झोड उठवतं. गेल्या वर्षीच्या अध्यक्षांनी वयोवृद्ध साहित्यिकांसाठी आरोग्य निधीची टुम काढली होती. त्यासाठी बऱ्याच देणग्याही जमवल्या होत्या. (त्यांचं पुढे काय झालं हा तपशील अजून तरी जाहीर झालेला नाही.) तशी काहीच टुमही या उमेदवारांनी काढलेली नाही. किती ही अरसिकता! केवढा हा आपपरभाव!!
 संमेलनाचं वातावरण तापणारच नसेल तर मग लोकांना त्याबाबत उत्सुकता निर्माण होणार तरी कशी? सगळेच लोक काही संमेलनाला जात नाहीत हेही खरं, पण वर्तमानपत्रांतून काही ना काही वाद घडल्याशिवाय लोकांना महाराष्ट्राच्या कुठल्यातरी कानाकोप-यात साहित्य संमेलन नामक उत्सव भरणार आहे, हे कळणार तरी कसं? किमान तो कळावा, यासाठी तरी चार-दोन वाद व्हायला हवेत. कुणी कुणाची तरी कुरापत काढायला हवी. कुणीच काहीच बोलणार नसेल तर मग काय फायदा?
आधीच्या संमेलनाच्या वेळेस अशी खिन्न आणि सुन्न करणारी शांतता नव्हती, म्हणूनच यावेळची शांतता प्रकर्षाने लक्षात येतेय आणि मुख्य म्हणजे ती आता खुपू लागली आहे. पायात मोडलेल्या काटय़ाचं खुपणं आणि या शांततेचं खुपणं सारखंच वेदनादायी आहे राव!
 
प्रा. रा. ग. जाधव, केशव मेश्राम, मारुती चितमपल्ली, अरुण साधू, म. द. हातकणंगलेकर, द. भि. कुलकर्णी, उत्तम कांबळे या सर्व संमेलनाध्यक्षांच्या वेळेस कसं वातावरण तयार झालं होतं, काही ना काही वाद झडले होते. आता तसं काहीच होत नाही. आनंद यादव महाबळेश्वरच्या संमेलनासाठी उभे राहिले तेव्हा तर किती मज्जा आली होती! ते निवडूनही आले, पण शेवटी महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या कृपाशीर्वादाने संमेलन अध्यक्षा- शिवायच पार पडलं. शिवाय या प्रत्येक वेळी संमेलनाध्यक्षांपेक्षा   ठाले पाटील हेच जास्त चर्चेत राहिले होते. आता तर तसंही घडताना दिसत नाही. उषा तांबे महामंडळाच्या अध्यक्ष झाल्यापासून तर महामंडळाच्या निदान बैठका तरी होतात की नाही हेही सालं कळत नाही. सारं आपलं गुपूचप. बाई स्वभावानं शांत असल्या तरी इतका शांत(शहाण)पणा काही उपयोगाचा नाही. कारण असंच शांतपणे चालू राहिलं तर भविष्यात साहित्य संमेलनच बंद पडेल, याची मोठी चिंता काही चिंतातूरजंतूंना लागून राहिली आहे. ते बंद झालं तर कितीजणाचं काय काय नुकसान होईल, कुणाकुणाचे हप्ते, दुकानदाऱ्या बंदे होतील! केवढा मोठा अनर्थ ओढवेल!!
 
यात काही गंमत नाही बुवा! साहित्य संमेलनात वाद पाहिजेतच. त्याशिवाय मजा नाही. नाहीतर ते व्यासपीठ सुन्या सुन्या मैफलीसारखं रुक्ष रुक्ष होऊन जाईल की! लोकही तिकडे फिरकणार नाहीत. आणि लोकच फिरकणार नसतील तर मग संमेलनाची शोभा ती काय राहिली? मग ‘संमेलनाध्यक्षाची डायरी’, ‘संमेलनाध्यक्षाचे दिवस’, ‘संमेलनाध्यक्षाच्या 365 रात्री’, अशी पुस्तकं पाडली जाणार तरी कशी?
 यावर्षी तर संमेलन चंद्रपुरात म्हणजे विदर्भात, दोन्ही उमेदवारही विदर्भातलेच. त्यात गेली काही वर्षे स्वतंत्र विदर्भाचा प्रश्न डोकं वर काढतो आहे. त्याविषयी काही ठोस भूमिका घेऊन किमान काही मतांची बेगमी करायची संधी होती. पण तीही या उमेदवारांनी अजून घेतली नाही. विदर्भातल्या चंद्रपूरच्या आणि गडचिरोलीच्या काही भागात नक्षलवादानं जनसामान्यांना-आदिवासींना त्राहीमाम करून सोडलं आहे. त्याविषयीही दोघंही काही बोलत नाहीत. शिवाय डहाके तर स्वत:चा प्रचारही करत नाहीत. ते या काळात नर्मदा परिक्रमेला काय जातात, कुटुंबाबरोबर गोव्याला काय जातात, सगळंच आश्चर्यकारक आहे. उमेदवारानं किमान आपला तरी प्रचार करावा की नाही? केवढा हा अलिप्तपणा! किमान आपल्या साहित्यसेवेच्या माहितीपर पुस्तिका छापवून घेऊन - त्यात सर्व पुस्तकं, त्यांना मिळालेले पुरस्कार, त्यांच्या अर्पणपत्रिका, त्यांच्यावर वेगवेगळ्या नियतकालिकांमध्ये आलेली परीक्षणं, आजवर दिलेली भाषणं, केलेले परदेश दौरे, संमेलनं-सभा-कार्यक्रमांची निमंत्रणं, काही विद्यार्थ्यांनी केलेले एम.फील, पीएच.डी.चे प्रबंध अशी सर्व माहिती - ती किमान सर्व मतदारांना पाठवून त्यांना दीपवून टाकावं की नाही? तर तेही नाही.
बरं असं काहीही न करता डहाकेच निवडून येणार असे अनेकांनी गृहीत धरलं आहे. तसं झालं तर बरंच होईल म्हणा. निदान आधीचे संमेलनाध्यक्ष आत्मपरीक्षण करतील आणि उद्याचे संमेलनाध्यक्ष काही बोध घेतील. पण पक्की खात्री नाही हां, आपला अंदाज नुसता.
 तेव्हा मायबाप साहित्यिकांनो, महामंडळाच्या पदाधिका-यांनो आणि संमेलनाध्यक्षपदाच्या उमेदवारांनो, सावध रहा. इशारा ध्यानात घ्या. वेळीच काहीतरी कारवाई करा आणि हा बिभत्स गारठा संपवून टाका. तो तुमच्याही तब्येतीलाही बरा नाही आणि आमच्याही. उगाच थोरामोठय़ांचे आदर्श उराशी कवटाळून बसू नका. काही उपयोग नसतो त्यांचा. त्या बिनकामाच्या गोष्टी असतात. राजकीय नेता काय नि साहित्यिक काय, तो हातावर हात आणि पायावर पाय मारून बसला की, निष्क्रिय होत जातो. निष्क्रियता हे राजकारणातून आणि साहित्यकारणातून निवृत्त होण्याचं लक्षण असतं. निवृत्त माणसांची घरीही उपेक्षा होते आणि दारीही. त्यामुळे कार्यप्रवण राहा. ही कानठळ्या बसवणारी शांतता नकोशी झाली आहे. त्यामुळे गेले काही दिवस आम्हाला जेवण गोड लागत नाही की रात्री झोप येत नाही. चॅनेलवाले पोरंपोरीही दंडुके घेऊन आमच्याकडे फिरकत नाहीत. त्यामुळे आम्हाला नव्या कविताही सुचत नाहीत. अशीच आमची उपेक्षा होणार असेल तर मग आम्ही मतदान तर करणार नाहीच, पण अण्णा हजारेंसारखं उपोषणाला बसू दिल्लीत, तुमच्या विरोधात. कारण आम्हालाही न्याय हवा आहे!

No comments:

Post a Comment